Lord Khandoba, Satara

श्री खंडोबा, सातारा

स्थान माहात्म्य

सातारा या गावचा इतिहास आहे. स्वतःचे ऐतिहासीक आस्तित्व आजही या गावाने जपवून ठेवले आहे. २०० ते ३०० वर्षांपूर्वीचे राहते चौकाचे वाडे गावाला चारही ठिकाणी असलेला परफेक्ट वॆस या बाबी ऐतिहासीक खुणा पटवितात. महाराष्ट्रातील खंडोबाच्या १२ स्थानांपैकी हे ८ वे स्थान म्हणून हा खंडोबा आहे. जेजुरी येथील खंडोबाचे हे पीठ असून हे मंदिर पुरातन आहे. हे मंदिर किती वर्षांपूर्वीचे असावे या बाबत गावकऱ्यात दोन मतप्रवाह आहेत.

खंडोबाचे मंदिर दगडी हेमाडपंथी असून, माळ्याचे बांधकाम विटेच्या चुऱ्यात झाले आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झालेला आहे.

गावात खंडोबाचे आगमन

सातारचा खंडोबा हा पूर्वी वास्तव्याला डोंगरावर होता. कदाचित तिथं जाण्यासाठी भाविकांची त्रेधातिरपिटी उडत असावी म्हणुन खंडोबाराया गावात आले, असा एक मतप्रवाह आहे.

येथील जहागीरदार नारायणराव दीक्षित हे सतत ४० वर्षांपासून नित्यनियमाने डोंगरावर जाऊन खंडोबाची पूजा-अर्चना करीत. त्यासाठी त्यांना दररोज २ कि.मी. अंतर चढावे व उतरावे लागत असे. त्यांची निस्सीम भक्ती पाहून नारायणरावांना खंडोबाने असा द्रुष्टांत दिला कि, वार्धक्यामुळे तू आता थकला आहे. तुझी मनोभावे सेवा पाहून तू म्हणशील तेथे पुढील वास्तव्य करण्यास तयार आहे. यावर नारायणराव म्हणाले,देवा तुम्ही माझ्या घरीच का वास्तवास येत नाहीत ? या वर तथास्तू म्हणुन खंडोबा म्हणाले "तू पुढे चाल,जाताना काळजी घे, मागे वळून पाहू नको. "

खरंच देव आपल्या मागे येत आहेत कि नाही हे पाहण्याची उत्सुकता शिगेला लागली म्हणुन नारायणरावांनी मागे वळून पहिले अन पहिले काय चमत्कार त्या क्षणीच देवाची मूर्ती झाली. तो दिवस गोकुळ अष्टमीचा होता. कालांतराने गोकुळ अष्टमीला खंडोबाचा उत्सव गावकरी करू लागले. हा उत्सव मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी या गावचे वतनदार गुले, सरोदे, जगदाळे, दळवे, जडे, आणि जेड परिवाराने अथक परिश्रम घेतले. पुढे कालौघात खोंडोबाचे टुमदार मंदिर बांधण्याचे गावकऱ्यांनी निश्चित केले. तो दिवस चंपाष्टमीचा होता. पहिला उत्सव नारायणराव दीक्षित यांच्या उपस्थितीत थाटात साजरा करण्यात आला. दरम्यानच्या काळात हजारोंच्या संख्येत या ठिकाणी उत्सवासाठी येऊ लागले. आजही हे परंपरा कायम आहे.

खंडोबाचे मंदिर बांधकामं तब्बल ५ वर्षे सुरु राहिले. त्यानंतर काही कारणांमुळे ते बंद पडले. नंतर १६८८ मध्ये अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धराचे काम पूर्ण करण्यात आले.

खंडोबारायांचे दर्शन

येळकोट येळकोट जय मल्हार

यात्रेची वैशिष्ट्ये

चंपाष्टमीपासून पुढे ५-६ दिवस भरत असलेल्या खंडोबाच्या यात्रेत विविध कार्यक्रमाचे देखणे आयोजन फार पूर्वीपासून करण्यात येते. यात प्रामुख्याने कलगीतुरा, वाघ्या-मुरळी,सवाल-जवाब,लोककला [लावणी आदी] कार्यक्रमांना रसिकांचा भरगच्च प्रतिसाद मिळतो.

कलगीतुरा या प्रकारात बिलवणी जोगन आदी गीतप्रकार असतात. यात दोन पाट्या असतात. एक कलगी तर दुसरी तुरा सातारची. कलगीतुऱ्याची वैशिष्ट्य म्हणजे यात संस्कृती चे जतन, लोकप्रबोधन आणि चांगली शिकवणूक नागरिकांनी अंगीकारावी हे सांगितले जाते. एका पार्टीत कमीतकमी १० ते २० मनुष्य असतात.

सातारा येथे लालखाँ म्हणून एक मुस्लिम कवी होऊन गेले.जन्माने मुस्लिम असूनही त्यांनी ग्रामदैवत खंडोबा आणि कृष्णा वर अनेक बिलवानी व जोगन हे गीतप्रकर रचले. लालखाँने हे गीत लिहून ठेवले नसले तरी परंपरागत पद्धतीने काही जेष्ठ आजही लालखाँच्या आवेशातच त्यांची गीत गाऊन दाखिवतात. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागते म्हणजे ते कै. आसाराम बनकर यांचे, ८० वर्षाचे आसाराम बनकर हे ठार अंगठेबहाद्दर. कुठल्याही शाळेत त्यांचे लौकिक शिक्षण झाले नव्हते. तरीही आपल्या तेजतर्रार करड्या आवाजात कवी लालखाँ यांचे गीत गाऊन ते ग्रामस्थांचे रंजन करीत होते. पूर्वी कलगीतुऱ्यातही ते भाग घेत व आपल्या प्रतिभेच्या जोरावर बक्षीसही मिळवित. आज कलगीतुऱ्याला मिळणाऱ्या थंड प्रतिसादाबद्दल व नवीन पिढीने तिकडे केलेल्या दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत असत. कवी लालखाँ यांनी रचलेले हे मूळ गीत आसाराम बनकर शेवटपर्यंत तारुण्याच्या जोशात गाऊन दाखवित.

खंडोबा दिलदार सामने पार l

नीम का झाड लहिरा लेता जा

इतवार का नगारा झडता जी जी l

पालखी मिरवणूक

चंपाषष्ठीला श्रीची पूजा अर्चना दीक्षितांच्या वाड्यात होते. आज घडीला दीक्षितांचे कोणतेही वारसदार येथे वास्तव्यास नाहीत. त्यांचे नातेवाईक असलेले दांडेकर परिवारा तर्फे पारंपरिक पद्धीतीने पालखीचे पुजन करण्यात येते. ही "श्री" ची पालखी डोंगरावरील जुन्या मंदिरात जाऊन त्याठिकाणी विधीवत पूजा अर्चना केली जाते. नंतर ही पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येते.


विधी

दर रविवारी श्रींची यथासांग दिवटीने दोनवेळा पूजा व इतर दिवसाची पूजा प्रभाकरराव धुमाळ हे आता करीत असतात. श्रींची आरती प्रामुख्याने दिवटीने केली जाते. दैनंदिन नैवैद्य हा वरण भात भाजी व पोळीचा असतो. रविवारचा नैवैद्य हा पुरणपोळीचा तर यात्रा काळातील नैवैद्य वांगे व कांद्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा असतो.

वधू-वरांची गर्दी

खंडोबाचा नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवपरिणीत वधू-वर खंडोबारायांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. याठिकाणी नवपरिणीत जोडप्यांच्या कुटुंबियांना खंडोबाचे गोंधळ जागरण, वाघ्या-मुरळी हे विधी करावेच लागतात,अशी श्रद्धा आहे.

अन् चमत्कार

दररोज रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सातारा गावातून खंडोबा फेरी मारून नंतर निद्राधीन होत असे, असा अनेकांचा समज आहे. १० ते १५ वर्षांपुर्वीचे ही हकीकत, दिलीप धुमाळ यांचे नातेवाईक वसंतदादा दांडगे हे खंडोबाच्या मंदिरात श्री च्या मूर्तीसमोर गाढ झोपले होते. श्री ने रस्त्यात का झोपला म्हणून उशी फेकून मारली व नंतर आपल्या गाव भ्रमंतीला निघून गेले.

एक मुस्लिम परिवारास अपत्यप्राप्ती होत नव्हती सर्व ईलाज करून झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून खंडोबाला नवस केला की, आमची काही जमीन तुला देऊत. कालांतराने त्या मुस्लिम दांपत्यास अपत्यप्राप्ती झाली. त्याने कबुल केल्याप्रमाणे जगा ही श्री च्या चरणी अर्पण केली.

अनेकांचा पदस्पर्श

छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, पू . पारनेकर महाराज यांनी या गावास भेटी देऊन खंडोबाचे दर्शन घेतले आहे. छत्रपती शिवाजी महाराज येथे साधुंच्या भगव्या कफनीत राहून औरंगजेबाच्या विरोधात गनिमीकावा आखात होते.